सृजन म्हणजे उत्पत्ती, आणि सृजनशीलता म्हणजेच नवीन निर्माण करण्याची क्षमता. वाळत चाललेल्या झाडाला फुटलेली नवीन कोवळी कोवळी  हिरवी पालवी, नांगरलेल्या कोरड्या जमिनीतून बीज अंकुरल्याने तरारून वर आलेला कोंब, रोज फुलांनी डवरणारं तगरीच्या फुलाचं झाडं, बिल्डिंग मध्ये जागा मिळेल तिथे बांधलेल्या घरट्यातल्या अंड्यामधून  बाहेर येत चिवचिवणारी चिमणीची पिल्लं ही सगळी निसर्गाच्या सृजनशीलतेची उदाहरणे. असाच माणसाच्या सृजनतेचा एक उत्सव म्हणजे प्रजनन अर्थात, नवीन जीवाची निर्मिती! माणसाच्या अस्तित्वासाठी गरजेचा असा हा उत्सव.

निसर्ग मुलामुलींमध्ये ह्या सृजनासाठी आवश्यक ते बदल घडवून आणायला जेव्हा सुरवात करतो तो म्हणजे पौगंडावस्थेचा काळ. शब्दशः सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा, म्हणजेच आपल्यातच दडून असलेल्या ह्या नवीन क्षमतेचा शोध लागण्याच्या आधीचा काळ! किशोरवयीन मुलामुलींमध्ये वेगवेगळ्या हार्मोन्समुळे, अनेक शारीरिक बदल घडून येतात. जसं की मुलींमध्ये छातीच्या आकारात वाढ, कमरेखालच्या भागाला गोलाई येणे, जांघेत आणि काखेत येणारे केस असे बदल होतात तर मुलांमध्ये भरदार छाती, दाढी-मिशा फुटणे, आवाजात जडपणा येणे असे बदल होताना दिसतात. लैंगिक अवयवांची वाढ, पिंपल्स, वजन आणि उंचीत भराभर होणारी वाढ हे दोघांमधले होणारे समान बदल. हे सगळे शारीरिक बदल पौगंडावस्थेची जाणीव करून देतात. पण ह्याच बरोबर अजून एक महत्वाचा बदल होत असतो तो म्हणजे मानसिकतेतला बदल. लैगिंक आकर्षण निर्माण होण्याची ही सुरवात असतेच पण हे हार्मोन्स इतर भावनांवरही परिणाम करतात. त्यामुळेच मी कोण, माझे जगण्याचे प्रयोजन काय, माझी उद्दिष्टं कोणती, ह्यासारख्या विचारांनी या वयातले भावविश्व व्यापलेले असते. स्वतःची सतत मित्रांबरोबर तुलना करत राहणे, नवीन नवीन गोष्टी करण्याची आणि शिकण्याची धडपड करणे, सतत बदलणारे मूड ह्या सगळ्यांमुळे ही अवस्था भावनिक दृष्टया नाजूक असते. कुठल्याही बंधनाविरुद्धच्या भावना तीव्र असतात. साहजिकच मोठ्यांपेक्षा, आपल्याच वयाची मित्रमंडळी जवळची होतात. मुलींसाठी साधारणपणे वयाच्या १० व्या, तर मुलांसाठी १२ व्या वर्षांपासून सुरु झालेली ही अवस्था साधारणपणे १५ ते १८ वर्षापर्यंत असते. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती हे इथेही लक्षात ठेवावे लागते.

शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सगळ्याच स्तरांवर वेगवान घडामोडी घडत असल्याने हा काळ हा तणावाचा असतो. पण पालकांबरोबर योग्य संवाद, समाजातील चांगल्याची संगत ह्यातून या काळात जडणघडण झाली तर ती पुढील निरोगी प्रजननाची पहिली पायरी असते.

प्रजनन म्हणजे एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होण्याची प्रक्रिया. पौगंडाव्यस्थेत व्यक्तीची स्त्री व पुरुष म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैगिक वाढ होते आणि ती तारुण्यात पदार्पण करते. ह्या वयात लैगिक प्रजननाला आवश्यक अश्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली अशी व्यक्ती प्रजननक्षम असते. माणसामध्ये लैगिक प्रजनन हीच एक प्रजननाची पद्धत आहे. स्त्रीमधील बीजांड (ovum) आणि पुरुषामधील शुक्राणू (sperm) आपापल्या बरोबर वेगवेगळ्या गुणसूत्रांच्या जोड्या वाहून आणतात. स्त्री पुरुषामधल्या शरीरसंबंधानंतर स्त्रीच्या गर्भाशयात त्यांचे फलन होते व त्यापासून नवीन गर्भाची निर्मिती होते. हा गर्भ आईच्या शरीरात नऊ महीने कलाकलाने वाढतो, स्वतःच वेगळं शरीर आणि अस्तित्व घेऊन जन्म घेतो आणि सृजनाचे एक चक्र पूर्ण होते.

प्रजननाच्या ह्या सृजनशील प्रक्रियेत, शारीरिक परिपक्वता ही जितकी महत्वाची तितकीच, मानसिक परिपक्वता ही महत्वाची. ह्या प्रक्रियेमध्ये दोघांनाही, पण विशेषतः स्त्रीला, बऱ्याच मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. हे बदल समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देण्यासाठी ही परिपक्वता असणे गरजेचे असते. योग्य शारीरिक आणि मानसिक काळजी घेतली तर, सृजनाचा हा उत्सव सर्वांसाठी नक्कीच आनंददायी ठरतो. पण बरेच वेळा आम्हां डॉक्टर्सना पेशंटशी बोलताना असं लक्षात येतं की अगदी विवाह होऊन अपत्यप्राप्तीचा निर्णय घेईपर्यंतही अनेक बाबतीत अज्ञान असते. नीट शास्त्रशुद्ध माहिती नसते. काही अडचणी असतील तर त्या मोकळेपणाने बोलल्या गेलेल्या नसतात, त्यावर योग्य वेळी उपचार झालेले नसतात. या सगळ्याचे फलित म्हणेज एका अतिशय नैसर्गिक क्रियेमध्ये अनेक बाधा येतात, वंध्यत्वासारख्या समस्या येऊ शकतात, काही गैरसमज असल्यामुळे सकारात्मक दृष्टीकोनच नाहीसा होऊन बसतो. झेनिथ क्लिनिककडे तुमच्या सर्व समस्यांवर उपचार आहेत आणि आम्ही आपल्याला मदत करायला कायम तत्पर आहोत. म्हणूनच या लेखमालेतून अशा अनेक विषयांवर जाणीव जागृती करून हा सृजनोत्सव आनंददायी कसा होईल हे आपण बघणार आहोत.

Book Appointment Today!

    Dr. Mamta Dighe is the Founder and Director of Xenith Advanced Fertility Centre. She is an IVF Specialist in Pune, Maharashtra, India. She studied medicine at the prestigious Seth G S Medical College and KEM Hospital in Mumbai, one of the most elite Medical Institutions in India. She is amongst the first three doctors in India to achieve the Degree of Fellowship in Reproductive Medicine, a sub-speciality of Gynaecology. She is an IVF Specialist in PCMC and Pune who deals with infertility, hormone problems, menstrual problems and a wide spectrum of problems in adolescent, reproductive and menopausal women.

    Book Appointment