चांगले आरोग्य म्हणजे शरीराची निरोगी स्थिती. म्हणूनच आरोग्याचा कुठलाही पैलू असो, तो मुख्यत्वे करून अवलंबून असतो तो आहारावर आणि जीवनशैलीवर. प्रजनन आरोग्य ही मग याला अपवाद कसे असेल? म्हणूनच अपत्यप्राप्तीचा निर्णय झाल्यावर आपल्या जीवनशैलीचा, आहाराचा आढावा घेणे जोडप्यासाठी आवश्यक असते. आपण जे खातो त्यातील पोषकतत्वे शोषली जाऊनच शरीरातील पेशी तयार होतात, हार्मोन्सची पातळी ठरते, सर्व अवयवांना ताकद मिळते आणि ह्या सर्वांमुळेच प्रजनन संस्थेचे आरोग्य चांगले राहते. म्हणून आपण जे अन्न खातो, तो उत्तम असावे याकडे लक्ष दिले पाहीजे. असा उत्तम आहार कोणता तर जो खाऊन आपल्याला उत्साही वाटते, आपली ताकद वाढते! वृत्ती प्रफुल्लित होतात असा आहार! अश्या उत्तम संतुलित आहाराने वजन नियंत्रित ठेवणे व एकदंर आरोग्य चांगले राखणे ही प्रजनन संस्थेचे आरोग्य चांगले ठेवण्याची पहिली पायरी असते. त्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचा आपल्या आहारात जाणीवपूर्वक समावेश करून आपण प्रजनन संस्थेला बळकटी देऊ शकतो. ह्यात मुख्यत्वे करून अशा अन्न घटकांचा समावेश होतो ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे आणि पोषणमूल्यांचे प्रमाण जास्त असते. अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषणमूल्ये ओव्यूलेशनची प्रकिया वाढवतात ( स्त्रीबीज ओव्हरी मधून गर्भाशयात येण्याचा वेग म्हणजे ओव्यूलेशन ) आणि स्पर्म्सचा वेग तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतात. ह्या दोन्हीचा गर्भधारणेसाठी उपयोग होतो आणि म्हणूनच चांगल्या परिणामांसाठी दोन्ही पार्टनर्सचा ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग गरजेचा आहे.

तर अशाप्रकारे विशेषतः प्रजनन संस्थेचे आरोग्य उत्तम राखण्यात पुढील पदार्थांचा समावेश होतो –

१. अक्रोड – ह्या मध्ये प्रथिने, व्हिटॅमिन B6, अनेक खनिजद्रवं, तसेच मुख्यते करून ओमेगा ३ सारख्या आरोग्यदायी फॅटी ऍसिड चा समावेश होतो. हे स्पर्म्स चा वेग वाढवण्यासाठी मदत करतात.

२. फळे – डाळींब, पेरू,केळ तसेच आंबट चवीच्या फळांचा म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी फळांमध्ये असलेल क जीवनसत्व, पॉलिमिन्स ची उच्च मात्रा स्त्री पुरुष दोघांच्या प्रजनन संस्थेला मदत करते

३. हिरव्या पालेभाज्या, भोपळा, टोमॅटो, गाजर, ब्रोकोली हे त्यातली अँटी ऑक्सिडण्ट्स आणि अ, इ आणि क जीवनसत्त्वांच्या मात्रे मुळे उपयुक्त ठरतात.

४. ऑलिव्ह ऑइल, अंडी. बांगडा, रावस ह्यांसारखे मासे हे ह्यातील ओमेगा-३ ऍसिडची स्पर्म्सचा वेग वाढवण्यास होते. 

५. टोमॅटो – टोमॅटो मधील अँटीऑक्सिडंट तसेच लायकोपेन स्पर्म्सची संख्या टिकवायला तसेच वेग वाढवायला मदत करतात.

काय खावे ह्या बरोबर काय खाऊ नये हेही समजून घेणे गरजेचे ठरते. फास्ट फूड अथवा कुठलेही निकृष्ट प्रतीचे अन्न खाऊन, कालांतराने अशक्तपणा येतो, कंटाळा येऊ लागतो, आळशी वृत्ती बनते. म्हणून असे अन्न टाळलेले बरे. तसेच खूप जास्त प्रमाणात घेतलेलं अल्कोहोल आणि कॅफिन, रेड मीट ज्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असते, धुम्रपान हे तर या काळात टाळलेलेच चांगले.

आहाराइतकेच जीवनशैलीकडे देखील लक्ष पुरवले गेले पाहीजे. अतिशय ताण तणाव असलेली जीवनशैली आरोग्यासाठीदेखील वाईट ठरते. मानसिक आरोग्य चांगले राहावे, ताण तणाव नियंत्रणात राहावेत म्हणून आपण मेडिटेशन किंवा तत्सम उपाययोजनांची मदत घेऊ शकतो. तसेच हे सर्व करत असताना स्वतःला खूप त्रास करून घेण्यापेक्षा एकावेळी थोडे थोडे बदल करत, मधून अधून स्वतः ला थोडी सूट देत जीवनशैली बदलली तर ते अधिक फायद्याचे ठरते.

शेवटी कुठलाही आहार अथवा जीवनशैली ही काही जादूची काडी नाही जी फिरवली आणि गोड बातमी मिळाली.. पण वंध्यत्वाच्या समस्येचा विचार करताना, आधुनिक वैद्यकीय उपचार सुरू करण्याआधी किंवा IVF सारख्या वेगळ्या पर्यायांचा अवलंब करण्याआधीची एक पायरी म्हणून याकडे नक्की बघता येते.

आपण जे खाऊ तेच आपल्यातून प्रकट होणार आणि म्हणूनच ‘उत्तम आहार देई आरोग्य अपार!’